"i सम्यक" बद्दल थोडक्यात

सम्यक समाजासाठी ६ बिंदूचा संस्कार - स्व अध्ययन - सामुहीकता - समत्व - सेवा - स्वातंत्र्य - संघर्ष.या ६ बिंदूचा संस्काराशी संबधित सर्व क्षेत्रां(अर्थशास्त्र, सेवाकार्य, विचार दर्शन, इतिहास व इतर) वर वाचन-लेखन -चर्चा-कार्यशाळा-सेवा-अनुभव या साठी "i सम्यक"
Our aim is to provide Education to people for social reform. Our thinking is Self Study - Togetherness - Equality - Self less Service - Freedom - Fight for right is the 6 point for Rite of society.

" सहा गोष्टी " तुम्हाला 'एम बी ए' चा अभ्यासक्रम नीट शिकवत नाही !


नमस्कार मित्रांनो ! चांगल्या संस्थेतला चांगला 'एम बी ए' हा बाजारात छान चालतो परंतु बऱ्याच प्रसंगांमध्ये तो हतबलही ठरतो. अन्यथा प्रत्येक चांगला 'एम बी ए' हा उत्तम उद्योजक झाला असता. अथवा असंही म्हणू शकलो असतो की प्रत्येक उत्तम उद्योजक वा व्यवस्थापक हा 'एम बी ए' असावाच ! जगभरातल्या बहुतेक सर्व व्यवस्थापन शिक्षण संस्थांमधून सहा महत्वाच्या गोष्टी नीटपणे शिकविल्या जात नाहीत, ज्या आपण इथे थोडक्यात पाहू - 

पहिली सर्वात महत्वाची बाब हा कोर्स नीट शिकवत नाही- कमी वेळेत आणि कमी श्रमात अपेक्षित उद्दिष्ट गाठणे. इथे व्यवस्थापनात बसलेल्या धुरीणांचं मन आणि मत जाणून त्यांना हवा तो "परिणाम" मिळवून देण्यासाठी चतुराई लागते जी वापरून "शॉर्टकट्स" अंमलात आणावे लागतात. ठोकताळ्यांनी होणाऱ्या कामासाठी प्रचंड विश्लेषणाची गरज नसते. आणि हो, साध्या सफरचंदाची अपेक्षा असताना काश्मिरी सफरचंद द्यायचीही गरज नसते ! 

दुसरी महत्त्वाची बाब हा कोर्स सांगत नाही - धोका नेमका कसा ओळखावा, तो पार करण्यासाठी कोणता गनिमीकावा वापरावा आणि कुठे आक्रमक व्हावं नि कुठे नमतं घ्यावं. या कोर्समध्ये धोक्याचे शंभर प्रकार सांगितले जातात पण त्यांना भिडण्याची नेमकी शक्कल नीटपणे सांगितली जात नाही.

तिसरी गोष्ट हा अभ्यासक्रम शिकवत नाही - श्रद्धा और सबुरी ! प्रसंगी नम्रता दाखवत, गाढवाला आपला काका बनवत नि संयम राखत चक्रव्यूहातून बाहेर पडावं लागतं. बाकी सारे सहकारी मागे हटत असताना आपण आपल्या स्वतःच्या कौशल्यावरील विश्वासाने निर्णय तडीस न्यायचा असतो. प्रचंड बौद्धिक चर्चेपेक्षा नेमक्या उत्तरांचा शोध कमी वेळेत घ्यायचा असतो. असं करताना नवनव्या कल्पनांवर धाडसाने, चिकाटीने व वेगाने काम करावं लागतं. अशा कल्पना कनिष्ठ कामगारांकडूनही घ्याव्या लागतात, आपला 'एम बी ए' चा अहंकार सोडून ! इथे हे लक्षात ठेवावं लागतं की "गाव करील ते राव काय करील !"

चौथी अत्यंत महत्त्वाची बाब कोणताही कोर्स शिकवत नाही - वेगवेगळ्या प्रकारच्या भ्रष्ट लोकांचा मुकाबला कसा करायचा. हे असे लोक स्वतःच्या कंपनीमध्येही असतात. सरकारी अधिकारी, राजकीय नेते, भागीदार, बँकर्स, पुरवठादार, वितरक आणि कंपनीचे मालक सुध्दा भ्रष्ट असतात. ह्यांना न दुखावता आपलं काम करून घेणं खूपच अवघड असतं. आणि स्वतः भ्रष्ट न होता काम करून घेणं तर प्रचंड अवघड असतं. या संपूर्ण जटिल प्रक्रियेमध्ये म्हणूनच "चांगले" अधिकारी वा उद्योजक मागे पडतात. 'एम बी ए' मध्ये "उद्योगातील सचोटी" या विषयावर बरेच बाहेरचे दिग्गज व्याख्यान द्यायला येतात पण "पतेकी बात कोई बताता नहीं !"

कोणत्याही 'एम बी ए' मध्ये स्वतःचा 'कर्ण' वा 'एकलव्य' होऊ न देण्याच्या युक्त्या सांगितल्या जात नाहीत. ही पाचवी महत्त्वाची बाब. अन्याय करणारे सर्वत्र असतात, फुकट श्रेय घेणारेही खूप असतात. आपली आशा व संयम न सोडता या लोकांना कल्पकतेने व प्रसंगी कूटनीतीने हाताळावं लागतं. कर्णाप्रमाणे दुर्योधनाकडे न जाता अर्जुनाची मानसिकता वापरत आपला " क्रुष्णसखा" शोधायचा असतो. एकलव्याचा निरागसपणा आणि मूर्ख आज्ञाधारकपणा दाखवला तर सर्वस्व हरण करणारे द्रोणाचार्य भेटणारच ! 'एम बी ए' मध्ये हे सुध्दा शिकवलं जात नाही की उद्योगातल्या भीष्माचार्यांना कसं नामोहरम करावं. बऱ्याच महाकाय कंपन्या छोट्या उद्योगांना सहजपणे गिळंकृत करतात. मोठमोठे 'एम बी ए' सुध्दा इथे हतबल ठरतात.

सहावी व अंतीम महत्त्वाची बाब म्हणजे बहुतेक 'एम बी ए' हे "अपयशातून सावरण्याचे" धडे शिकवत नाहीत. ह्यांचा कल हा यशाच्याच 'केस स्टडीज' शिकविण्याकडे जास्त असतो. अपयशी होत असताना आपलं अस्तित्व टिकवणं, त्यासाठी तडजोडी करणं, स्वतःकडे कमीपणा घेऊन छोट्यातली छोटी मदत मागणं इ. गोष्टी या कोर्समध्ये सहसा नीटपणे सांगितल्या जात नाहीत. " Attachment" आणि "Detachment" मधील संतुलन साधत यशाच्या वा अपयशाच्या प्रत्येक टप्प्याला मन स्थिर ठेवून पार करायचं असतं. बहुतेक चांगले 'एम बी ए' यासाठीची "बुद्धी" वापरायला सांगतात पण "प्रज्ञे"ची व्याख्या करून तिचा उपयोग करण्याचा मार्ग मात्र दाखवत नाहीत. अर्थात एवढं सगळं सांगून झाल्यानंतर सुध्दा मी एक सल्ला जरूर देईन की संधी मिळताच चांगल्या संस्थेतून एक चांगला "एम बी ए" जरूर करा, कारण तिथे जे "शिकवलं" जातं ते एका "रेडिमेड पँकेज" सारखं असतं. प्रत्येक गोष्ट आपण स्वानुभवातून शिकू लागलो तर संपूर्ण आयुष्य नाही पुरायचं नि मग उत्तम असं करिअर केव्हा घडायचं ? हां, तिथं जे शिकवलं जात नाही ते इथं माझ्यासारख्यांच्या फेबू वॉलवर शोधायचं ! काय पटतय ना ?!
------- डॉ. गिरीश जाखोटिया.

No comments: