"i सम्यक" बद्दल थोडक्यात

सम्यक समाजासाठी ६ बिंदूचा संस्कार - स्व अध्ययन - सामुहीकता - समत्व - सेवा - स्वातंत्र्य - संघर्ष.या ६ बिंदूचा संस्काराशी संबधित सर्व क्षेत्रां(अर्थशास्त्र, सेवाकार्य, विचार दर्शन, इतिहास व इतर) वर वाचन-लेखन -चर्चा-कार्यशाळा-सेवा-अनुभव या साठी "i सम्यक"
Our aim is to provide Education to people for social reform. Our thinking is Self Study - Togetherness - Equality - Self less Service - Freedom - Fight for right is the 6 point for Rite of society.

" अपमान

नमस्कार मित्रांनो ! काही महिन्यांपूर्वी गावी गेलो असताना आर्थिकदृष्ट्या गरीब असणाऱ्या मित्राच्या मुलांसोबत संवाद साधत होतो. चुणचुणीत असणाऱ्या धाकट्याने विचारलं, " काका, आमचे काही श्रीमंत नातेवाईक जमेल तेव्हा आमचा अपमान करीत असतात. मला प्रचंड राग येतो. आई - बाबा सहन करतात. मला नाही सहन होत. अस्वस्थ होतो मी. काय करू ? " मी शांत स्वरात त्याला सांगू लागलो , " अमोल, हा अनुभव मी सुद्धा तुझ्या वयात खूप वेळा घेतलाय. यावरील उपाय खूप साधे आणि सोपे आहेत. मुळात अपमान करणाऱ्यांबाबत रागाची वा सुडाची भावना ठेवू नकोस. या भावनेनेच तू अस्वस्थ होतोस. अशा अस्वस्थपणाने आपली ऊर्जा आपणच वाया घालवतो. अपमान करणाऱ्यांपेक्षा तू तुझ्या क्षेत्रात मोठा हो. त्यांना तुझ्या मोठा होण्याने आपोआपच शिक्षा मिळेल व तुझी ऊर्जा सुध्दा सत्कारणी लागेल." 
एखाद्याने आपला केलेला अपमान आपण मानलाच नाही तर तो होतही नाही. करणाऱ्यालाही मग अपमान केल्याचा आनंद मिळत नाही.एखादा आपला अपमान करण्याची बरीच कारणे असतात. अहंकार, सुडाची भावना, द्वेष वा मत्सर, वंशाभिमान, स्पर्धेतून येणारी असुरक्षितता, नैराश्य आणि तत्सम मानसिक असंतुलन इ. कारणांमधून अपमानाची व्युत्पत्ती होते. बऱ्याचदा गैरसमजातूनही अपमान झाल्यासारखं वाटतं. एखादी व्यक्ती प्रचंड शिस्तप्रिय अथवा " Perfectionist " असेल तर तिच्या वाचिक वा शारीरिक प्रतिक्रिया सुद्धा आपणांस अपमानास्पद वाटू शकतात. त्या व्यक्तीचा मात्र अपमान करण्याचा हेतू नसतो. काही समाजांच्या वा व्यक्तीसमूहांच्या चालीरीतींनुसार आपण न वागल्यास त्यांना तो अपमान वाटू शकतो.अशाच एका सांस्कृतिक संस्थेच्या कार्यक्रमात प्रमुख वक्ता म्हणून बोलताना त्यांच्या नेत्याचा उल्लेख मी " आदरणीय " असा केला. श्रोत्यांची अपेक्षा होती कि मी " पुज्यनीय " हा शब्द वापरायला हवा होता. थोडक्यात काय तर " धारणां " मधल्या फरकांमुळे सुध्दा ' अपमानजन्य ' परिस्थितीची निर्मिती होऊ शकते! मेंदूची प्रगल्भता जेवढी कमी तेवढी अपमानाची भावना जास्त. टीका आणि अपमान यामधील फरक न कळणारे बरेच मागासलेले समाज आपल्या अवतीभोवती असतात. टिकेचं संयुक्तिक उत्तर देता नाही आलं कि " अपमान झाल्या " ची मोठी बोंब मारायची ! - ही या मागासलेल्यांची नेहमीची रणनीती असते. साधारणपणे बौद्धिक मांद्य अथवा मानसिक संकुचितपणाने पछाडलेल्या समाजांमध्ये मानापमानाचे प्रसंग पदोपदी येत असतात. अशा समाजांमध्ये तथाकथित " श्रद्धास्थानां " ची अगदी रेलचेल असते. बौद्धिक मांद्य जोरकस असल्याने बऱ्याच श्रध्दास्थानांचं वास्तवदर्शी आकलन केलं जात नाही वा करू दिलं जात नाही. "मानापमाना " ची गोळी सकाळ - संध्याकाळ चघळणारा असा समाज मग आपोआपच निस्तेज होत जातो. अशा समाजावर राज्य करणं मग कुवत नसलेल्या अहंमन्य लोकांना सहजसाध्य होतं.
अपमानाला सामोरं जाणं वा टाळणं अथवा अपमान पचवणं किंवा अपमान करणाऱ्यांना हाताळणं खूप सोपं असतं. यासाठी अपमान होण्याच्या वा करण्याच्या तीन मुख्य प्रक्रिया लक्षात घ्यायला हव्यात. अपशब्द ( वाचिक वा कायिक वा लिखित बोली ), अनुल्लेख आणि अन्याय या त्या तीन प्रक्रिया होत.
अपशब्द वापरणाऱ्यांना शक्यतो टाळलेलं बरं. ही टाळण्याची मानसिक प्रक्रिया सुलभ करण्यासाठी अपमान करणाऱ्याचं सांस्कृतिक मागासलेपण ग्रुहित धरलं कि आपण स्वतःच खुदकन हसू शकतो. ह्यांना उत्तर द्यायचंच असेल तर ते संयमित पण रोखठोक असावं. आपल्या एका उत्तरानंतर आपण दुर्लक्ष करावं कारण आपली ऊर्जा आणि वेळ हा आपणच वाचविला पाहिजे. " अनुल्लेखाने अपमानित " करण्याचा घ्रुणास्पद प्रकार हा जगभर चालतो. योग्य मंचावर आपल्या गौरवास्पद उल्लेखासाठी आपण आपली कामगिरी उंचावत रहायचं असतं. अनुल्लेखाने टाळणारे स्वतःला असुरक्षित समजत असतात. अशा ' कमअस्सल ' लोकांशी भांडण्यात आपण आपली शक्ती का वाया घालवावी ! स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवत आपण आपल्या ध्येयावर जोमाने काम करीत रहायचं. एखादा मोठा फलंदाज छोट्या अपयशाने जेव्हा अपमानित केला जातो तेव्हा तो मुर्खांच्या नादी न लागता पुढच्या सामन्यात आपल्या फलंदाजीने उत्तर देतो.
विविध मार्गांनी सतत अन्याय करीत अपमानित करण्याचा पारंपारिक प्रकार अहंमन्य बलदंडांकडून केला जातोच.अशावेळी भावनांच्या आहारी न जाता तारतम्याने वागलं पाहिजे. मुळात आपण अडचणीत असतो वा दुर्बल असतो म्हणून हा अपमान सहन करावा लागतो. थंड डोक्याने अपमान गिळत वेळ निभावून न्यायची असते. स्वतःला मोठं करण्यासाठी वा अन्यायातून सुटका करून घेण्यासाठी किंवा आपलं नेटवर्क बलशाली होईपर्यंत संयमाने योग्य संधीची वाट पहायला हवी. अपमान आणि अन्याय करणाऱ्या बलदंडांना कळणारही नाही अशा पध्दतीने आपली ऊर्जा आणि गरीमा वाढवायची असते. तोपर्यंत या नालायकांशी जमवून घेण्याचं नाटक करायचं असतं.
प्रत्येक अपमान हा आपलं स्फुल्लिंग चेतवणारा ठरला पाहिजे. स्वतःला सिध्द करण्याची ऊर्जा आपण त्यातून घेतली पाहिजे. काही वेळा आपल्या चुकांमुळे सुध्दा आपण अपमानित होण्याची परिस्थिती ओढवून घेतो. आपल्या चुकीचं विश्लेषण करून व आवश्यक असल्यास ती मान्य करून पुढं जात राहिलं पाहिजे. प्रासंगिक अपमानांनी चित्त विचलित झालं तर स्वतःशीच शांतपणे एकांतात संवाद साधायचा आणि आपल्या मोठ्या ध्येयाची आठवण करायची. ध्येय आठवलं कि ऊर्जा आठवते नि आपण स्वतःला पुन्हा सन्मानित करू लागतो. आपण स्वतःला स्वतःशी सन्मानित ठेवू शकलो तर कोणत्याही अपमानाचे वार आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत ! जग किंवा समाज बदलविणाऱ्या कोणत्याही महापुरुषाला आठवा. बहुतेकांनी बरेच अपमान सोसत आपलं इप्सित ध्येय गाठलं आहे. मन मस्त राखा आणि मेंदू कार्यान्वित ठेवा, कोणताही अपमान तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाही !
------- डॉ. गिरीश जाखोटिया.

No comments: