"i सम्यक" बद्दल थोडक्यात

सम्यक समाजासाठी ६ बिंदूचा संस्कार - स्व अध्ययन - सामुहीकता - समत्व - सेवा - स्वातंत्र्य - संघर्ष.या ६ बिंदूचा संस्काराशी संबधित सर्व क्षेत्रां(अर्थशास्त्र, सेवाकार्य, विचार दर्शन, इतिहास व इतर) वर वाचन-लेखन -चर्चा-कार्यशाळा-सेवा-अनुभव या साठी "i सम्यक"
Our aim is to provide Education to people for social reform. Our thinking is Self Study - Togetherness - Equality - Self less Service - Freedom - Fight for right is the 6 point for Rite of society.

माओवाद्यांचा लाल सलाम ?

डाव्यांचे आंतरराष्ट्रीय नेटवर्क कामाला लागले आहे. काश्मीर विषयक अहवाल, भारतात स्त्रियांची परिस्थिती सीरिया आणि येमेनपेक्षाही भयंकर आहे असे सांगणारा थॉम्प्सन रायटर्स फाउंडेशनच्या ५०० विचारवंतांचा 'अंदाज' आणि आता ही माओवाद्यांच्या सुटकेची मागणी ! ही सगळी एकच साखळी आहे. 

भारतातल्या हिंसाप्रेमी माओवाद्यांविषयी आंतरराष्ट्रीय पातळीवरील त्यांच्या भाऊबंदांना काळजी वाटणे स्वाभाविकच आहे. युनोच्या मानवी हक्कविषयक काही तज्ज्ञांनी भारतात तुरुंगात डांबलेल्या काही माओवाद्यांना त्वरित सोडून देण्याची मागणी केली आहे.भारतात गेल्या काही महिन्यांत शहरी नक्षलींच्या विरोधातील मोहीम ऐरणीवरती आली तीच मुळात माध्यमांच्या बदललेल्या स्वरूपामुळे आणि कोणत्याही प्रश्नाचा स्वतंत्र प्रज्ञेने विचार करणाऱ्या तरुणांच्या नव्या पिढीमुळे.बंगालमध्ये सत्तरीच्या दशकात उगवलेल्या 'लाल गुलाबांना' पहिला खरा हिसका दाखवला तो काँग्रेसच्या सिद्धार्थ शंकर रे यांनी. चारू मुजुमदारांच्या साथींनी जादवपूर विद्यापीठाला तेंव्हाही आपला अड्डा बनवले होते. 

माओच्या सांगण्याप्रमाणे शहराभोवतालची खेडी प्रथम पेटली पाहिजेत. त्यासाठी कलकत्ता व जादवपूर विद्यापीठातील, कम्युनिस्टांच्या संपर्कातील बरेच विद्यार्थी बंगालमधील खेड्यापाड्यांत गेले. तेथे भ्रमनिरास होऊन हे माओचे शिष्य मग कलकत्त्याच्या रस्त्यांवर धुमाकूळ घालू लागले. गांधीजी, रवींद्रनाथ आणि विवेकानंदांचे पुतळे फोडणे, देशभक्तीपर साहित्य जाळणे आणि विद्यापीठाच्या कुलगुरूंपासून रस्त्यावरचे वाहतूक पोलीस आणि फेरीवाल्यांना वर्गशत्रू म्हणून ठार मारणे हे या नक्षलींच्या क्रांतीचे स्वरूप. त्यांची पाठराखण करणारे प्राध्यापक,पत्रकार आणि नेते तेंव्हाही होतेच.तीन वर्षे कलकत्त्याला वेठीला धरणाऱ्या या लालभाईंना मुख्यमंत्री सिद्धार्थ शंकर रे, तत्कालीन सैन्यप्रमुख जनरल सॅम माणकेशा ,गृहसचिव गोविंद नारायण यांनी अक्षरशः नेस्तनाबूत केले. माओच्या सांस्कृतिक क्रांतीची भारतात नक्कल करू पाहणारे नक्षलवादी आणि त्यांचे छुपे 'शहरी' साथीदार हे भारताच्या सार्वभौमत्वालाच आव्हान देत आहेत हे या तिघांनीही पक्के ओळखले होते.बंगालमधून बाहेर पडलेल्या नक्षलवादाचे कट्टर 'माओ'वादात रूपांतर केले ते तेलंगणाच्या कोंडापल्ली सीतारामय्याने. वरंगलच्या सेंट गॅब्रिएल शाळेतील हा एक शिक्षक. शहरी नक्षलींची कल्पना याच सीतारामय्याने चारू मुजुमदारांच्या गळी उतरवली. 


क्रांतिकारी लेखक संघ, जन नाट्य मंडळी आणि रॅडिकल स्टुडंट्स युनिअन या शहरी नक्षलींच्या संघटना एका मागोमाग एक तेलंगणात उभ्या राहिल्या. काकतीय आणि उस्मानिया विद्यापीठ हे नक्षलींचे बालेकिल्ले. प्रयोगशाळा जाळण्यापासून झेंडावंदनावर बहिष्कार टाकण्यापर्यंत आणि चालती रेल्वे पेटवण्यापर्यंत अनेक मार्गांनी या नक्षल समर्थकांनी गावागावात, विद्यापीठात आणि शहरात आपली दहशत बसवली होती. प्रारंभी नक्षलींशी नमते घेणाऱ्या काँग्रेस व तेलगू देशमने नंतर मात्र राजकीय पातळीवरून दोन हात करणे सुरु केले. उत्तर तेलंगणातील वरंगल, खम्मम, करीमनगर आणि आदिलाबाद जिल्ह्यातील संघ,भाजप आणि अभाविपच्या शेकडो कार्यकर्त्यांना नक्षलींकडून अक्षरशः टिपून मारले गेले.आंध्र-तेलंगणातील या रक्तरंजित संघर्षाचा इतिहास सांगणारे पुस्तकच डॉ.शेषगिरी राव यांनी लिहिले आहे.नक्षलींच्या विरोधात बोलणाऱ्या माधव रेड्डी, इंद्रा रेड्डी या धडाडीच्या मंत्र्यांना नक्षलींनी ठार मारले तर चंद्राबाबू नायडू हे अक्षरशः अशाच एका हल्ल्यातून थोडक्यात वाचले.रोहित वेमुला आत्महत्त्येच्या दुर्दैवी प्रकरणात नक्षलींनी पुन्हा एकदा शिरकाव करण्याचा जोरदार प्रयत्न केला पण नक्षलवाद,त्यांचे छुपे समर्थक आणि आंदोलने ताब्यात घेणारी त्यांची यंत्रणा याची खडानखडा माहिती असणाऱ्या चंद्रशेखर रावांनी अत्यंत हुशारीने या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या बाहेर एक पाऊलही ठेऊ दिले नाही. राहुल गांधी आणि अरविंद केजरीवालपर्यंत सगळ्यांनी जंग जंग पछाडले पण हे आंदोलन देशात काय पण हैद्राबादेतही पेटले नाही याचे कारण या प्रकरणाची दुसरी बाजू जोमाने पुढे आणणारी प्रभावी सोशल मीडिया आणि नक्षलींना पुरते ओळखून असणारे टी.आर.एस.चे चंद्रशेखर राव !केंद्र सरकारला केवळ विरोध करायचा म्हणून हट्टाला पेटलेल्या काँग्रेसला आंध्र-तेलंगणातील नक्षलींविरोधातील सर्वपक्षीय निर्धाराचा हा इतिहास विसरता येणार नाही.पुढे ऐंशीच्या दशकात शहरी नक्षलींच्या जाळ्यात महाराष्ट्रातील अनेक विद्यर्थी येऊ लागले. मुंबईची अनुराधा शानभाग आणि कोबाद गांधी हे त्यापैकीच एक. बस्तरच्या जंगलांत जाऊन राहिलेल्या अनुराधाचे दुर्धर अशा स्क्लेरॉसीस च्या आजाराने २००९ मध्ये निधन झाले तर कोबादला त्याच साली दिल्लीत अटक झाली. मागील महिन्यात अटक झालेले पाच पैकी तिघेजण हे याच अनुराधा शानभाग आणि कोबाद गांधींचे सहकारी आहेत.नक्षलींची पहिली-दुसरी पिढी जंगलातल्या तळांवरुन लढली तर ही पुढची पिढी शहरांभोवतालची खेडी पेटवायला निघाली. हे सांगणे थेट माओचेच.सगळीच पोथीनिष्ठा.व्यवस्थेचा सर्वंकष विध्वंस, क्रांतीच्या ज्वाला,सार्वत्रिक हिंसा असं सर्व काही या पोथीनिष्ठेत येतं.कामगार लढे संपले आणि जंगलातल्या आदिवासींना घेऊनही क्रांतीचे वणवे पेटेनात म्हणून जातींजातीत संघर्ष उभा करून विद्रोहाच्या नांवाखाली हिंसेच्या चिथावण्या.पोलिसांकडून गोळीबार घडवण्याच्या, दंगली पेटवण्याच्या योजना. त्याच साठी इतिहासाची मोडतोड, आक्रस्ताळी भाषा आणि आगलाव्या नेत्यांना पाचारण. जातीपातींना एक करणाऱ्या हिंदुत्वाशीही म्हणूनच यांचे हाडवैर.त्याच साठी 'मनु'वादाची आवई आणि 'पेशवाई' आल्याचा पुकारा !काळ पुढे आलाय. माहितीची साधने बदलली आहेत. वैचारिक विरोध आणि द्वेष यातील फरक कळण्याइतपत लोक शहाणे झाले आहेत.तर्कवादाने, बुद्धीने विश्लेषण करणारा तरुण महाविद्यालयांतून शिकतो आहे. बौद्धिक कसरती करून भ्रम निर्माण करण्याचे दिवस संपलेत. 

नक्षलींचे पारंपरिक माध्यमांतील मित्र आणि त्यांचे प्रचार-तंत्र हेच मुळात स्वतःचा संदर्भ हरवले आहे.भारताचे समग्र भावजीवनच नाकारणारी क्रांती मुळात येथे यशस्वी होणारच नाही आणि माओच्या पोथीत लिहिलेले हे 'एल्गार' करण्याचे मार्गही येथून पुढे टिकणार नाहीत.अस्पृश्यतेच्या अमानवी प्रथेविरुद्ध बाबासाहेबांनी अहिंसक आणि विधायक लढा उभारला आणि तो यशस्वीही करून दाखवला. कोणत्याही अन्यायाविरुद्ध दाद मागतांना हिंसा हा पर्याय असूच शकत नाही हे अधोरेखित करणारा त्यांचा संघर्ष होता. मार्क्सची हिंसा नाकारून ते बुद्धाच्या मार्गाने गेले.सामाजिक अन्यायाविरुद्ध सनदशीरपणे संघर्ष करून विजय मिळवता येतो याचे दैदिप्य्मन उदाहरण म्हणजे हा अस्पृश्यता विरोधातील लढा.'मी 'अस्पृश्य' म्हणून जन्माला आलो असतो तर माझी 'अहिंसा' डळमळीत झाली असती' असे खुद्द सर्वोदयाचे जनक विनोबा भावे म्हणत असत. या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांचा अहिंसक लढा अधिकच उठून दिसतो.'सकारात्मक' संघर्षाचे एव्हढे जाज्वल्य उदाहरण समोर असतांना चीनच्या माओचा आदर्श घेण्याचे कारणच नाही. त्याने बंदुकीच्या नळीतून आणलेली सांस्कृतिक क्रांती खुद्द चीनमध्येच पाचोळ्यासारखी उडून गेली आणि 'शिका,संघटीत व्हा व संघर्ष करा' हा मंत्र देत बाबासाहेबांनी घडवलेली सामाजिक क्रांती समतेच्या एका नव्या संस्कृतीचा उगमस्रोत ठरली. विध्वंस आणि विधायकतेत फरक असतो तो हाच ! भारतीय समाज हा तात्कालिक कारणांनी कदाचित हिंसक आंदोलनांसाठी उद्दीपित होईल पण व्यवस्थेच्या सर्वंकष विध्वंसासाठी तो कधीच तयार होणार नाही हे आतातरी नक्षल समर्थकांनी ओळखले पाहिजे.

भारत हा लेनिनच्या काळातला रशिया नाही आणि माओच्या टाचेखालचा चीनही नाही .तसा तो कधीच नव्हता. हे असे पेटवापेटवीचे तत्वज्ञान यशस्वी होईल आणि भारतातही क्रांतीचे बिगुल वाजेल असे समजून,अजूनही एका हातात बंदूक घेऊन दुसऱ्या हाताने 'लाल सलाम' ठोकणाऱ्यांचा मार्ग शेवटी तुरुंगाकडेच जाईल.Post By - Jayant Kulkarni सर

No comments: