"i सम्यक" बद्दल थोडक्यात

सम्यक समाजासाठी ६ बिंदूचा संस्कार - स्व अध्ययन - सामुहीकता - समत्व - सेवा - स्वातंत्र्य - संघर्ष.या ६ बिंदूचा संस्काराशी संबधित सर्व क्षेत्रां(अर्थशास्त्र, सेवाकार्य, विचार दर्शन, इतिहास व इतर) वर वाचन-लेखन -चर्चा-कार्यशाळा-सेवा-अनुभव या साठी "i सम्यक"
Our aim is to provide Education to people for social reform. Our thinking is Self Study - Togetherness - Equality - Self less Service - Freedom - Fight for right is the 6 point for Rite of society.

लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे


१२ डिसेंबर १९४९ रोजी बीड जिल्ह्यातल्या नाथ्रा या गावामध्ये लिंबाबाई आणि पांडुरंग मुंडे या जोडप्याच्या घरी गोपीनाथ मुंडे यांचा जन्म झाला. दोन भाऊ, घरची परिस्थिती बेताची त्यामुळे कष्टाच्या परिस्थितीतच त्यांनी शिक्षण घेतलं. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी कष्ट आणि जिद्द यांच्या जोरावर त्यावर मात करून पुढे जात राहणं हा त्यांचा स्वभावधर्मच होता; याजोरावरच प्रतिकूल परिस्थितीशी झगडतच अंबेजोगाईमधल्या जोगेश्वरी कॉलेजमधून त्यांनी बी.कॉमची पदवी घेतली.
त्यानंतर लॉ करण्यासाठी ते पुण्याला आले. शिक्षण सुरू असतानाच त्यांना राजकारणात रस निर्माण झाला. दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्याशी त्यांचा स्नेह जुळला. त्यांच्यामुळेच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे आकर्षित झाले. शिक्षण सुरू असतानाच १९७१ पासून त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेबरोबर कामाला सुरुवात केली. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी १९७८ मध्ये निवडणुकीच्या राजकारणात उडी घेतली. त्यावर्षी ते बीड जिल्हा परिषदेवर निवडून गेले. पुढचा प्रवास विधानसभेच्या दिशेनं सुरू झाला. १९८० मध्ये रेणापूर विधानसभेवर ते निवडून गेले. यानंतर ते तब्बल 5 वेळा विधानसभेत निवडून गेले. विधानसभेत त्यांची कारकीर्द चांगलीच गाजली. विशेषतः १९९२ ते ९५ या कालावधीत ते विरोधी पक्षनेते असताना आपल्या अभ्यासू भाषणांनी त्यांनी सत्ताधारी काँग्रेसला अक्षरशः सळो की पळो करून सोडले. विशेषतः तेव्हा काँग्रेसमध्ये असलेल्या शरद पवार यांना त्यांनी विशेष लक्ष्य केलं होतं.
१९९६ मध्ये युतीचं सरकार येण्यामध्ये मुंडेंच्या झंझावाती प्रचाराचा खूप मोठा वाटा होता. पण शिवसेनेला भाजपपेक्षा जास्त जागा मिळाल्या आणि मुंडेंना मुख्यमंत्रीपदावर पाहण्याचं भाजपच स्वप्न अपूर्ण राहिलं. त्यांना राज्याचं गृहमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावं लागलं. विरोधी पक्षात असताना त्यांनी राजकारणातील गुन्हेगारीकरणाविरुद्ध आवाज उठवला होता. सत्ता हाती आल्यानंतरही त्यांनी हा मुद्दा सोडला नाही. हे करताना कोणाच्या कितीही धमक्या आल्या तरी मुंडे आपल्या उद्दिष्टापासून जराही ढळले नाहीत. उल्हासनगर, वसईबरोबरच संपूर्ण मुंबईतील गुन्हेगारी कमी करण्यासाठी मुंडे यांनी पावलं उचलली. गृहमंत्रीपदाच्या काळात गोपीनाथ मुंडे हे गुन्हेगारांचा कर्दनकाळच ठरले होते. या काळात दाऊद टोळीसह अनेक कुख्यात गुंडांचं एन्काउंटर करण्यासाठी त्यांनी पोलिसांना परवानगी दिली. त्या दरम्यान जवळजवळ ४०० गुंडांना कंठस्नान घालण्यात आलं. अशा त-हेने गुंडाराज संपुष्टात आणून मुंबई दहशतमुक्त करण्याची विलक्षण कामगिरी मुंडे यांनी केली. यासाठी पोलिसांवर विश्वास दाखवून त्यांना आवश्यक ते साहाय्य मुंडे यांनी दिलं होतं. मुंबई त्यांची ही कामगिरी कधीही विसरणार नाही!
राज्यात नेत्रदीपक कामगिरी बजावल्यानंतर पक्षाने त्यांच्यावर राष्ट्रीय जबाबदारी सोपवली. प्रमोद महाजन यांच्या निधनामुळे रिकामी झालेली जागा भरून काढण्याचं कामच एकापरीनं त्यांच्यावर सोपवण्यात आलं. २००९ मध्ये ते सर्वप्रथम बीडमधून लोकसभेत निवडून गेले. १५ व्या लोकसभेत त्यांच्यावर लोकसभा उपनेतेपदाची जबाबदारी सोपवण्यात आली, ती त्यांनी जबाबदारीने पार पाडली.
त्यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी राज्यामध्ये भाजप-शिवसेना-रिपाइं आणि स्वाभिमानी पक्ष यांची जी महायुती आकाराला आली त्याचे शिल्पकार हे गोपीनाथ मुंडे हेच होते. देशात भाजपला बहुमत मिळाल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांना महत्त्वाचं पद मिळणार हे अपेक्षित होतं. त्याप्रमाणे त्यांच्याकडे केंद्रीय ग्रामविकास खात्याची धुरा सोपवण्यात आली. त्यानंतर राज्यात लवकरच होणार्‍या विधानसभा निवडणुका त्यांच्याच नेतृत्वाखाली लढवल्या जातील, असं भाजपनं जाहीर केलं होतं. पण दुर्दैवाने तस घडल नाही.
भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला राज्यात ऐतिहासिक यश मिळाल्यानंतरही या यशानं हुरळून न जाता त्यांनी विधानसभेसाठीची तयारी तातडीने सुरू केली होती. विधानसभेतही महायुतीचीच सत्ता आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले होते. पण हे सगळं अर्ध्यावर सोडून एका दुर्दैवी अपघातात गोपीनाथजी अनंताच्या प्रवासाला निघून गेले.
राजकारणात अगदी तळागाळापासून कामाला सुरुवात करुन राष्ट्रीय राजकारणात स्वतःचं नाव कमावलेल्या राज्यातल्या काही मोजक्या नेत्यांमध्ये गोपीनाथ मुंडेंचा समावेश करता येईल. त्यातही राजकारणाचा कोणताच वारसा नसताना, मराठवाड्यातल्या मागास भागात जन्म घेतलेल्या गोपीनाथ मुंडे यांनी अपार कष्टाच्या जोरावर जी काही झेप घेतली, त्याला तोड नाही. महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणात ‘मास लीडर’ म्हणून ओळखल्या जाणा-या गोपीनाथजींची उणीव अवघ्या महाराष्ट्राला सदैव भासत राहील. त्यांच्या जाण्यानं मराठवाड्याच, महाराष्ट्राच, देशाच व मुख्यतः भाजपच झालेलं नुकसान कधीही न भरून येणारं आहे!
लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या संघर्षमयी पावन स्मृतींस विनम्र अभिवादन!
📝 राकेश राजपूत 

No comments: