"i सम्यक" बद्दल थोडक्यात

सम्यक समाजासाठी ६ बिंदूचा संस्कार - स्व अध्ययन - सामुहीकता - समत्व - सेवा - स्वातंत्र्य - संघर्ष.या ६ बिंदूचा संस्काराशी संबधित सर्व क्षेत्रां(अर्थशास्त्र, सेवाकार्य, विचार दर्शन, इतिहास व इतर) वर वाचन-लेखन -चर्चा-कार्यशाळा-सेवा-अनुभव या साठी "i सम्यक"
Our aim is to provide Education to people for social reform. Our thinking is Self Study - Togetherness - Equality - Self less Service - Freedom - Fight for right is the 6 point for Rite of society.

मला काय त्याच...??चित्तोडची महाराणी पद्मावती हिच्या सौंदर्याची दिगंत किर्ती ऐकून बावचळलेला वासनांध तुर्क अल्लाउद्दीन खिलजी चित्तोडभोवती वेढा टाकून बसला होता. बुलंद दरवाजा, भक्कम तटबंदी असलेल्या लढावू रजपुतांचा चित्तोडगड दाद देत नव्हता. हताश, कामातूर खिलजीला एके दिवशी स्वप्न पडले. महाराणी पद्मावती त्याच्यासमोर उभी होती. अल्लाउद्दीन नखशिखांत शहारला. महाराणी पद्मावतीकडे पुढे पुढे सरकू लागला. क्षणार्धात महाराणी पद्मावतीत महाकाली महादुर्गा संचरली आणि तिने धडावेगळे केलेले अल्लाउद्दीन खिलजीचे शीर तिच्या चरणांवर पडले. या अल्ला, या अल्ला ओरडत अल्लाउद्दीन खिलजी झोपेतून जागा झाला. अंगातून घामाच्या धारा वहात होत्या. पहाटे पडलेल्या स्वप्नाचा मतितार्थ समजून घेऊन एखादा विचारी संस्कारी पुरुष गुमान परत फिरला असता! पण तो अल्लाउद्दीन खिलजी होता! बुलंद दरवाजा तोडून किल्ल्यात घुसायचा व महाराणी पद्मावती हस्तगत करायचा निर्णय करुन तो चित्तोडगडावर चाल करुन गेला. पुढे मागे हजारो तुर्क सैनिक! तुंबळ युध्द झाले. विजयी उन्मादात अल्लाउद्दीन खिलजी बुलंद दरवाजातून आत प्रवेशता झाला आणि त्याचा चेहरा खाडकन उतरला. चिताभस्माचे ढीगच्या ढीग दिसत होते. शूरवीर रजपुत सैनिकांची प्रेतं इतस्ततः विखुरली होती. जिंकलेल्या अल्लाउद्दीन खिलजीचा चेहरा निस्तेज आणि चित्तोडसाठी लढता लढता वीरगतीला प्राप्त झालेल्या रजपुत सैनिकांच्या चेहऱ्यावर दिव्य तेज! रजपुत स्रियांचे नामोनिषाण कुठे दिसत नव्हते. अल्लाउद्दीन खिलजी काय समजायचे ते समजून चुकला. क्रोधाग्नीने त्याचा चेहरा लालेलाल झाला. युध्द जिंकूनही तो हरला होता. गडावरील मठमंदीरं उध्वस्थ करायचा त्याने सुडादेश दिला आणि ...
महाराणी पद्मावतीवर चित्रपट बनवताना असे भव्य दिव्य स्वप्न बॉलीवुडचा महान दिग्दर्शक संजय लीला भन्साळीला का पडले नाही?
चित्तोडभोवती अल्लाउद्दीन खिलजीचा वेढा पडल्यामुळे किल्ल्यातला धान्यसाठा संपत आला होता. बाहेरुन रसद येऊ शकत नव्हती. महाराजा रतनसिंह चिंताग्रस्त झाले होते. कुणीही परपुरुष रजपुत महिलाचे नखही पाहू शकत नाही, या रजपुती परंपरेला चित्तोडगडने मुरड घातली. अल्लाउद्दीन खिलजीने गडावर निरोप पाठवला होता की महाराणी पद्मावतीचे मला आरशात तरी दर्शन घडवा, मी आल्या पावली निघून जाईन! शत्रुलाही दिलेल्या शब्दाला जागणारे रजपुत आणि जन्मदात्या बापाला दिलेला शब्द मोडणारे तुर्क! महाराजा रतनसिंह त्यांच्या धर्माला जागले आणि अल्लाउद्दीन त्याच्या धर्माला जागला. महाराणी पद्मावतीचे आरशातले सौंदर्य बघून अल्लाउद्दीन खिलजी अधिकच चेकाळला. चित्तोडगडचा वेढा त्याने आणखी भक्कम केला.
महाराजा रतनसिंह यांनी मनात ठाम निश्चय करुन राजदरबार भरवला, विचार विनिमय करण्यासाठी! सेनाधिकारी आणि समस्त राजसभा यांच्या नजरा महाराज रतनसिंह यांच्या चेहऱ्यावर खिळल्या होत्या. धीरगंभीर आवाजात महाराज रतनसिंह रावल बोलु लागले. माझ्या प्रिय मेवाड बंधुभगिनींनो, आपण परम भाग्यशाली आहोत. आपल्या प्रिय चित्तोडगडाच्या शाही विवाहाचा मुहूर्त ठरला आहे. आपले आराध्य दैवत महादेव, देवाधिदेव महादेव प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहाणार आहेत. हर हर महादेव! हर हर महादेव! गडाच्या पायथ्याशी तळ ठोकून बसलेल्या अल्लाउद्दीन खिलजी तुर्कालाही शाही खलिता धाडला आहे. चित्तोडगडावर रुधिराभिषेक करावयाचा आहे. महाकालचे शाही स्वागत नरमुंडमालांनी करावयाचे आहे. जोहररुपी रक्तकेसरी गुलाल उधळाववायचा आहे. स्वागतात कुठेही कमतरता राहता कामा नये. रजपुत परंपरेला कुठेही गालबोट लागता कामा नये. बुलंद दरवाजा उघडा. केसरी वस्त्र परिधान करुन महाकालचे भव्य स्वागत करा. त्याच्या स्वागतासाठी महाराणी पद्मावतीसह तमाम सौंदर्यवतींचे चिताभस्म तयार ठेवा. चला, चित्तोडगडाच्या शाही विवाहाच्या तयारीला लागा. ... शूरवीर बादल कुजबुजला. मी सांगत होतो, हे तुर्क मुळीच विश्वासपात्र नाहीत. त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला हवे होते. पण आता वेळ निघून गेली आहे. आता त्यांना आपण आपल्या सनातन भाषेतच उत्तर देऊ. ... हर हर महादेवच्या गगनभेदी ललकाऱ्यांनी दरबार रोमांचित झाला कारण सर्वोच्च त्याग करायची वेळ आली होती.
हा हा म्हणता ही वार्ता राणीमहालांपर्यंत पोहचली. महाराणी पद्मावतीसह तमाम रजपुत वीरांगनांच्या अंगात वीरश्री संचरली. सनातन भारतीय परंपरेला सर्वाधिक काय प्रिय असेल तर नितीमत्ता आणि त्यासाठी सर्वस्वाचे बलिदान! रजपुत क्षत्राणी आणि त्यांच्यासाठी जोहरकुंड सजू लागले.
महाराजा रतनसिंह यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी चित्तोडगड जेवढा सजला नव्हता तेवढा आता त्याच्या शाही विवाहाच्या या प्रसंगी सजवला जात होता. प्रचंड उत्साह ओसंडून वहात होता. शत्रूची खांडोळी करता करता वीर मरण! शीलरक्षणार्थ जोहर! क्षत्रीयांच्या आयुष्यातील सर्वोच्च क्षण! रजपुत स्रिया सौभाग्य श्रृंगार करुन आणि रजपुत योध्दा शस्त्रसज्ज होऊन पुढील आदेशाची आतूरतेने प्रतिक्षा करत होते. चंदन, श्रीफळ, तूप, धूप, धीप, गंगाजल, तुलशीदल सारी जय्यत तयारी चालली होती. पुरोहितांनी राजमहालांकडे निरोप पाठवला की पहिले सूर्यकिरण जोहरकुंडावर पडले की जोहर सुरु होईल! पहिला आणि शेवटचा जोहर कुणाचा ते महाराणी पद्मावती ठरवतील. आहुती-राष्ट्रसमर्पण करण्याचा परमोच्च क्षण! ढोल, ताशे, नगारे वाजू लागले तसतसे साऱ्या चित्तोडगडात वीरश्री संचरु लागली. पूर्व क्षितिजावर रक्तिम लालिमा दिसू लागली. सर्व सतींनी आपापल्या पतीदेवांचे अंतिम दर्शन घेतले. तलवारीच्या पात्यांवर सर्रकन अंगठा चिरुन पतीदेवांनी धर्मपत्नींचे कुंकुमतिलक केले. महाराणी पद्मावतीला महाराज रतनसिंह कांही सांगू पहात होते, परंतु महाराणी पद्मावतीच्या चेहऱ्यावरील दिव्य तेज बघून ते गप्प राहिले. आज महाकालच्या पुजेसाठी चिताभस्म तयार करायला निघाली होती राणी पद्मावती! अग्रपुजेचा मान तिचा होता. महाकालात विलीन व्हायला निघाली होती महाकाली पद्मावती!

सूर्यनारायणाचे पहिले किरण जोहरकुंडावर पडले आणि धगधगत्या अग्नीकुंडात, मंत्रघोषात क्षत्रिय रजपुत स्त्रियांच्या समिधा पडू लागल्या. क्षणभर सूर्यदेवही काळवंडला असेल! पावन अग्नीत पावन देहांची आहुती! शीलरक्षणार्थ! सोळा सहस्त्र समिधा! वायुमंडल सुगंधीत झाले. पार्वतीला शिवाची शक्ती म्हणतात! आपापल्या अर्धांगिनींचे शौर्य बघून रजपुत वीरांच्या भुजांमध्ये हजार हत्तींचे बळ आले. बादलच्या वृध्द मातेची शेवटची आहुती पडली आणि जोहरयज्ञ संपन्न झाला.
बुलंद दरवाजा उघडला गेला आणि रजपुत सेना अल्लाउद्दीन खिलजीच्या सैन्यावर तुटून पडली. घनघोर युध्द झाले. एकेका रजपुत वीराने १००-१०० तुर्क कापून काढले तरीही तुर्क शिल्लक राहिलेच! ...
इसवी सन ७११ मध्ये पहिला अरब आक्रमक मोहमद बिन कासिम सिंधवर चाल करुन आला. त्यावेळी भारतात शेकडो क्षत्रिय घराणी होती, त्यांच्या रियासती होत्या परंतु, उर्वरित भारतातील एकही हिंदू राजा सिंधच्या मदतीला धावला नाही. सिंध पराभूत झाले आणि तिथेच अरबांनी हिंदुंना जोखले.
इसवी सन १३०३ पर्यंत अरब मुसलमान भारतात बरेच लांबवर आत घुसले होते. अल्लाउद्दीन खिलजी दिल्लीचा बादशहा होता तेव्हा! त्याने चित्तोडवर स्वारी केली तेव्हाही भारतात अनेक हिंदू रियासती अजून शिल्लक होत्या. परंतु कुणीही चित्तोडच्या मदतीला गेले नाही. मला काय त्याचे? परकीय आक्रमकांविरुध्द ज्याने त्याने लढावे किंवा तडजोडी कराव्या किंवा शरण जावे! मला काय त्याचे? याच निष्क्रियतेमुळे भारत परकीयांच्या गुलामगिरीत गेला. आक्रमक जेते एकटे येत नसतात, त्यांच्या बरोबर त्यांचा धर्मही असतो. त्यामुळे हिंदू आक्रसत गेले आणि भारताच्या भौगोलिक सीमाही आक्रसल्या!
स्वतंत्र भारतात आमची मानसिकता अजून तीच आहे, मला काय त्याचे? म्हणूनच काश्मिरी पंडीत आपल्याच मातृभूमीत निर्वासित जीवन जगत आहेत. भारतातल्या नऊ-दहा प्रांतात हिंदू अल्पसंख्य होण्याच्या मार्गावर आहेत. मला काय त्याचे? बांग्लादेशी घुसखोरांमुळे आसाम-बंगाल प्रांतातील स्थानिक भूमीपुत्र उध्वस्थ होत आहेत. हा त्यांचा प्रश्न आहे, मला काय त्याचे? कोण कुठले रोहिंग्या मुसलमान ब्रह्मदेशातून आले आणि भारतात घुसले. मला काय त्याचे? भारत सरकार बघून घेईल! मोदी सरकार म्हणाले, रोहिंग्यांनों आपण अनाधिकृत घुसखोर आहात. आपल्याला परत जावेच लागेल. तर कित्येक मुल्ला-मौलवी केंद्र सरकारलाच आव्हान देत रोहिंग्यांच्या पाठीशी उभे राहिले! काँग्रेस नेते कपिल सिब्बल, प्रशांत भूषण प्रभूती वकील रोहिंग्यांचा बचाव करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेले! अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुणी मकबूल फिदा हुसेन हिंदू देवदेवतांच्या बिभत्स प्रतिमा चितारतो, बॉलीवुडचा कुणी संजय भन्साळी सतत मर्कट लीला करतो. चित्तोडच्या किल्ल्यातच नव्हे तर भारतभर हजारो पद्मावती आक्रोश करत आहेत! मला काय त्याचे? हा रजपुत समाजाचा प्रश्न आहे, मला काय त्याचे? हा पुरोहितांचा प्रश्न आहे, मला काय त्याचे? हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, मला काय त्याचे? हा शिक्षकांचा प्रश्न आहे, मला काय त्याचे? ही माझ्या बापाची समस्या आहे, तो बघून घेईल! मला काय त्याचे? हद्द झाली!मला काय त्याचे?
-अज्ञात

No comments: